आई वडिलांचे ऋण

आमच्या घरी अंडीवाल्या भैय्यापासून कचरेवाल्या मावशींपर्यंत सगळ्यांना खूप प्रेमाने, आपलेपणाने आणि महत्त्वाचे म्हणजे समानतेने वागवले जाते.

माझे आजोबा मासे विकणाऱ्या भैय्याला स्वतः  चहा बनवून देत आणि घरी धुणीभांडी करणार्‍या गड्यासोबत बसून क्रिकेट मॅच पाहत असत.

माझे बाबा काॅलनीमधे election duty साठी आलेल्या बायका आणि इतर पोलिसांना बाथरूम वापरण्याकरिता, पिण्याचे पाणी भरून घेण्याकरिता घरी बोलावतात. आई माशांच्या भाजलेल्या तुकड्यांपैकी एखादा चांगला तुकडा आधी कामवाल्या गड्याकरिता ठेवते.
हे आणि असेच अनेक इतर दाखले लहानपणापासून समोर असल्याने गडीमाणसे, विक्रेते, नोकरचाकर यांच्याशी आदराने वागायचे बाळकडू आपोआप मिळाले आणि यामधे आपण काही विशेष करतो आहोत असे वाटले नाही.

पण आज जेव्हा आजुबाजुला पाहते आणि काही जण केवळ सामाजिक स्तर आणि पैसा यांच्या जोरावर आपल्यापेक्षा कमी असलेल्यांना माणूस म्हणून कमी लेखताना दिसतात तेव्हा माझ्या घरच्यांचा अभिमान वाटतो.

आपण जर नशिबाने उच्च वर्णीय, सधन, वरील सामाजिक स्तरावर असू तर उलट आपण समाजाचे देणे लागतो. आणि जितके द्यावे तितके थोडेच. एकंदर समाजाचा जीवन स्तर उंचावावा म्हणून कित्येक माणसे काम करत असतात; त्यांना त्यांच्या कामामध्ये आपण मदत करू शकत नसलो तरी आर्थिक मदत करावी. आपल्या आजुबाजुला आपण काही बदल घडवू शकतो का ते पहावे. आणि निदान सर्वांना सन्मानाने वागवावे.

विंदांच्या कवितेप्रमाणे,
देणार्‍याने देत जावे,घेणार्‍याने घेत जावे;
घेता घेता एक दिवस, देणार्‍याचे हात घ्यावेत.

Advertisements