मिष्का च्या नव्या गंमती

मिष्का आता खूप काही बोलते. गाण्यांमधल्या एखाद्या शब्दाचा अर्थ विचारायचा तर “हे काय ” म्हणून विचारते. स्वतःची वाक्ये बनवते.
त्यात माझे आणि नीरजचे बरेच शब्द उचलले आहेत तिने.
“अरे!” हा माझा तर “ओ तेरी” हा नीरजचा.

आता तिला माणसे ओळखू येतात आणि लक्षात राहतात, अगदी आठवण काढण्यापुरती.

इतर मुलांसोबत खेळणे ही सुद्धा नवी प्रगती.

अर्चिस तिच्या पाळणाघरातला जवळचा मित्र. फार गोड पोरगा आहे. आम्ही त्याच्या आधी घरी जायला निघालो तर निरोपाचा एक कार्यक्रम असतो. मिष्का त्याला bye करणार, मग तो तिला bye  म्हणणार, मग पुन्हा ही, आणि मागोमाग तो. असे करत करत तो दरवाजा पर्यंत येणार. मग दरवाजा बंद झाला की मावशी त्याला कडेवर उचलून घेणार आणि तो दरवाज्याच्या खिडकीतून bye करणार आणि मिष्का गाडीमधून. असे  bye bye करणे गाडी निघेपर्यंत चालूच. हे तर राॅबिन हूड आणि धाकला जाॅनच्या  नदी पार करण्यासारखे झाले, तू मला सोड आणि मी तुला.

काल बाहेर जेवायला गेलो असताना तिथल्या playing area मधे एक पोरगा भेटला, मिष्का पेक्षा दोनेक वर्षाने मोठा. त्याला ही फारच आवडली. गालाला हात लावून झाला. आगेमागे पळून झाले आरडाओरडा करत. आमची निघायची वेळ झाली तरी हा काही मिष्काला सोडायला तयार नाही. आम्हाला म्हणाला, “जाऊ नका “. आमच्या सोबत Parking पर्यंत आला. शेवटी मी त्याला त्याच्या आई बाबांकडे सोडायला गेले.
नीरज म्हणाला, “It was love at first sight for him” 🙂

Advertisements